Monday, February 16, 2015

प्रतीक्षा

"मंद मंद पहाटवारा सुटला होता. सुस्तावलेली काही पाने त्याच्या हळुवार स्पर्शाने उगीच सळसळत होती. ती सळसळ इतकी मंजुळ, जणू कुणा नर्तकीच्या घुंगरांचा नादच.
रात्रभर आळसावून पसरलेले नागमोडी रस्ते अजूनही साखरझोपेतच होते. काळोखाची मखमली दुलई ओढून, वनदेवतेची स्वप्ने पाहत कूस पालटत होते.
चंद्रकोर मावळतीला लागलेली आणि काळ्याभोर आभाळाच्या वेलींवर नक्षत्रांचे घड लगडले होते. लहान मोठ्या शेकडो तारकांचे गुच्छ उमलत होते.. विझत होते.
एक उनाड धुमकेतू , वारा प्यायलेल्या वासरागत हुंदडत होत.

शुभ्र फुललेल्या मोगऱ्याच्या ताटव्या प्रमाणे दिसणाऱ्या, नक्षत्रांच्या या फुलोऱ्याकडे, एक निष्पर्ण उदास झाड, रात्रभर टक लावून बघत होते.
आभाळाकडे चांदण्यांची फुले आहेत, या रस्त्याकडे धूळभरल्या पावलांचे ठसे आहेत आणि आपल्याकडे मात्र या निष्प्राण फांद्यांखेरीज काहीच नाही म्हणून नियतीला कोसत, मूकपणे अश्रू ढाळत होते.

अचानक इतका वेळ शालीन नववधू प्रमाणे नम्र असणारा वारा खट्याळ बालकाप्रमाणे धावू  लागला.
असाच धावता धावता एके ठिकाणी आभाळाशी अडखळला.
त्याच्या त्या हळुवार धक्क्यानेही मेघलतेला लगडलेली काही चांदफुले हळुवारपणे त्या दुखी: झाडावर टपटपली.

त्या चंदेरी स्पर्शाने ते झाड मोहरुन गेले. त्याने त्या चंद्रफुलांना आपल्या अंग खान्द्यावर खेळविले. फांद्यांचा झुला करून जोजविले. त्या इवल्या इवल्या तारकांनीही त्या झाडाच्या कुशीला आईची कूस समजून स्वतःला तीत
झोकून दिले.

त्या हरवलेल्या चिमण्या तारकांना शोधायला निघालेला धुमकेतू निश्चल होऊन, डोळेभरून त्या झाडाचे सुख पाहू लागला. त्याच बेसावध क्षणी वारा पुन्हा एकदा धुमाकेतुशी अडखळला.
त्या धक्क्याने तो अंगारपुष्प धुमकेतू त्या झाडावर विखुरला.
भयचकित झालेल्या तारकांनी ते तांबडे अंगार आपल्या अंगावर झेलले. दाह स्वतःकडे घेऊन इतकावेळ आपल्यावर प्रेम करणाऱ्या त्या एकाकी झाडावर चांदणे बरसविले.

त्या चंद्रपुष्पांचे प्रेम पाहून ते झाड कृतकृत्य  झाले. त्याने त्या चिमुकल्या चांदण्यांना स्वतःची मुले म्हणून जवळ केले आणि कोवळ्या पहाटेला साक्षी ठेवून त्यांचे बारसे घातले. पहाट सरता सरता त्या बालतारकांचे नामकरण "पारिजातक" झाले होते. ते झाड अतीव समाधानाने आपल्या कोमल नवजात चंद्रपऱ्याना उरी कवटाळून बसले होते.

चंद्ररसात भिजलेल्या पांढऱ्याशुभ्र, मुलायम पाकळ्या, धुमकेतूच्या विखुर्ण्यातून मिळालेले, उगवतीच्या आभाळाप्रमाणे दिसणारे ताम्बडेभडक देठ असे अनुपम सौंदर्य लाभलेले ते मोत्यांचे गुच्छ आता त्या झाडालाही लगडले होते.
त्याचे दुख:, एकाकीपण सारे एका क्षणात नष्ट झाले होते. ते झाड अतीव प्रेमाने आपल्या चिमुकल्या सुगंधित शिशुंकडे पाहत होते.

पण दुसऱ्याच क्षणी, विलक्षण खेदाने त्या झाडाचे मन भरून आले. त्याला माहित होते, ही रात्राफुले नवा दिवस उगवताच आपल्याला सोडून निघून जातील. मग पुन्हा ते शापित एकटेपण. त्या एकटेपणाचा विचार येताच ते झाड शहारले. त्या बालतारकांच्या वियोगाच दुखी: विचार मनात येताच कष्टी झाले. त्याचे डोळे मूकपणे अश्रू ढाळू लागले. ते अश्रू त्या नाजूक तारकांवर टपटपू लागले. त्या नाजूक तारकांना त्या अश्रूंचा भार पेलवेना. त्या ओझ्याने त्या कोसळू लागल्या. झाड दुखा:वेगाने गदगदू लागले. चंद्रफुलांचा त्या धूळभरल्या रस्त्यावर वर्षाव होऊ लागला.

नुकतेच फटफटू लागले होते. उगवत्या सूर्याला वंदना देत सारी सृष्टी जागी होत होती. आळोखे पिळोखे देत जागा होणारा रस्ता सगळीकडे शुभ्र चांदण्यांचा खच पाहून आश्चर्यचकित झाला होता. ते झाड़ मात्र त्या धूळभरल्या रस्त्याशेजारी, नित्याप्रमाणे, सूर्याला वंदन न करता, अधोमुखी अश्रु ढाळत कालोख्या रात्रीची वाट पाहात होते..


Story and pic courtesy - shraddha kadam
Lines on the picture - unknown

No comments:

Post a Comment